पाच दिवसीय ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन अहवाल

वैदिक संशोधन मंडळ (आदर्श संस्कृत शोध संस्था) पुणे येथे दिनांक २४ जुलै २०२३ रोजी पाच दिवसीय ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश व कार्यक्रमाचे विशेष अतिथी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा. देवनाथ त्रिपाठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वैदिक मंत्रांसह कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी डॉ. ओंकार जोशी यांनी वैदिक मंत्रपठण केले आणि डॉ.वैष्णवी पाटील यांनी शारदा स्तवन केले.

डॉ. विरिवेंटि सुब्रह्मण्यम्,प्रभारी संचालक, वैदिक संशोधन मंडळ यांनी अतिथींचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. श्री. कृष्णा माळी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. अनिर्वाण दाश यांनी हस्तलिखितांवर काम करणाऱ्या राष्ट्रिय पाण्डुलिपि मिशन चा परिचय करून दिला व हस्तलिखितांशी संबंधित योजनांचा तपशील दिला. विद्यार्थी व संशोधकांसाठी या क्षेत्रात अशा प्रकारच्या कार्यशाळांच्या आयोजनांवर भर दिला पाहिजे असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर प्रा. देवनाथ त्रिपाठी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लिपि आणि भाषा एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे भाषेइतकेच लिपीलादेखील महत्व आहे असेही  त्यांनी प्रतिपादन केले. तसेच प्रा. सरोजा भाटे यांची विशेष उपस्थिति या कार्यक्रमास होती. यांनीही या कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यानंतर सौ. मुक्ता मुळे-सराफ यांनी आभार व्यक्त केले व डॉ. विद्या सागी यांनी एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमास संस्कृत, प्राकृत, प्राच्यविद्या क्षेत्रातील अनेक प्राध्यापक,संशोधक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरातून ४५ प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झालेले आहेत. संस्थेतील संपादक श्री. कृष्णा भगवान माळी हे शारदा लिपीचे तर प्रतिलिपिका डॉ. विद्या सागी ह्या ग्रंथ लिपीचे प्रशिक्षण देतील.

Media Coverage-Navrashtra

पुण्यात ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन; राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश यांची प्रमुख उपस्थिती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*